लोणी काळभोर, ता. 29 : हवेली तालुक्यातून वाहत असलेल्या मुळा मुठा नदीपात्रात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमुरतोय, अनेक प्रजातीचे मासे व जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी आसपासच्या गावातील कुटूंबाचा उदरनिर्वाह असणाऱ्या छोट्यामोट्या मस्त्य व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
हवेली तालुक्यातील मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कोलवडी, अष्टापुर, भवरापुर व त्यापुढे नदीतीरावर असलेल्या गावातील नदी पात्रात ही जलवनस्पती सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे नदीचे पात्र हिरवेगार झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या जलपर्णीमुळे नदीपात्रातील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर दगावले असून सध्या अस्तित्वात असलेल्या जलप्राण्यांचे जीवन संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा मोठा फटका याभागातील छोट्या मासे व्यवसायिकांना बसत आहे. काही ठिकाणी जलपर्णी सडून गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गुंधी पसरली आहे. पाळीव प्राणी व शेतपिकांच्या पाण्यावर ही विपरीत परिणाम होत आहे. नदी पात्रातील या दुषीत पाण्याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे.
मुळा, मुठा नदी लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी लिफ्ट योजना सुरू आहे. त्याठिकाणीही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर जमा झाली असल्याने शेतकऱ्यांना शेतीस पाणी देता येत नसल्याने हवालदिल झाले आहेत. यामुळे नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलत चालले आहे. पर्यावरणास या जलपर्णी घातक ठरू लागल्या आहेत. संबंधित विभाग व पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संघटनांनी नदीपात्रातील या जलपर्णी काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. भविष्यात नदी पात्रात होणारी जलपर्णीची वाढ ही नदीकाठालगतच्या गावांना धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी – चिंचवड व चाकण एमआयडीसीतील कंपन्यामधील रासायनिक पाणी व पुणे शहरातील मलजलयुक्त सांडपाणी थेट नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे या नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. पूर्वी नदीवरून आजूबाजूंच्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या. परंतु, आता नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी बोअर व विहिरीचे पाणी वापरावे लागत आहे. काही गावांना तर पाणी विकत घ्यावे लागत आहे.
दरम्यान, महानगर पालिकेच्या वतीने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात. लाखोंच्या पटीत खर्च केला जातो. परंतु तोकड्या यंत्रणेमुळे जलपर्णीची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे. तसेच नदी लगत असलेल्या बहुतेक गावात जमा होत असलेला ओला व सुका कचरा, प्लास्टिक, राडारोडा नदीपात्रात टाकतात. त्यामुळेही नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होऊ लागली आहे. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनीच आता मुळा-मुठा नदी प्रदूषण मुक्तीसाठी तातडीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण निवारण मंडळासमवेत पर्यावरण विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.