पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांसह अन्य जलकेंद्रातील टाक्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्या कारणामुळे येत्या गुरुवारी (दि.22 ऑगस्ट) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कामामुळे शुक्रवारी (दि.23 ऑगस्ट) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पर्वती येथील नवीन आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र तसेच त्याअंतर्गत एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, खडकवासला जॅकवेल, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुशृंगी टाकी व त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.
बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी आधीच सतर्क होऊन पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. तसेच मुबलक पाणी भरुन ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.