-बापू मुळीक
सासवड : “आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एका वर्षात सोडविणार आहे. यासाठी खडकवासला आणि भामा आसखेड धरणामधून भूसंपादनासह 390 कोटींची योजना महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक कमिटीच्या मान्यतेला सादर आहे. त्यामुळे या परिसराचा पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार आहे,” अशी ग्वाही महाविकास आघाडीतील पुरंदर-हवेली मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार संजय जगताप यांनी दिली.
आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) परिसरात संजय जगताप यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पदयात्रा, कोपरा बैठकीतून झंझावाती प्रचारदौरा केला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून युवक, नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत प्रोत्साहन दिले. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठार, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरात दौरा केला. अनेक संस्था, संघटनांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
संपूर्ण आंबेगावातील मतदार संजय जगतापांच्या पाठीशी राहील, असा विश्वास गणेश कोंढरे यांनी दिला. आमदार जगताप यांनी कोरोनाकाळासह केलेल्या विकासकामांचे पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यामुळे आमदार जगताप यांचा आत्मविश्वास आणखी वाढला असून, आंबेगाव परिसरातील वाहतूक कोंडीबाबत एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याचे सांगत सुनियोजित विकासासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन गणेश कोंढरे यांनी केले.
दरम्यान, गेली पाच वर्षे आमदार जगताप यांच्या मतदारसंघातील हजारो कुटुंबांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्यामुळेच त्यांना शहरी व ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आपण महाविकास आघाडीचा आणि विकासाचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी आगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे समाजातील अनेक संघटनांही त्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत, असे कोंढेरे यांनी यावेळी सांगितले.
पाच वर्षांत आमदार संजय जगताप यांनी आंबेगाव परिसराच्या विकासासाठी मोठा हातभार लावला. पाण्याचा प्रश्न, जीवघेण्या वाहतूक समस्येवर तोडगा काढून परिसर स्मार्ट बनवला. आमदार फंडातून विविध भागात विकासात्मक कामे केली. सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. जनहितासाठी अनेक विकासकामे केली. त्यामुळे आंबेगाव परिसरातून त्यांना मताधिक्य मिळणार आहे.
-सुधीर कोंढरे, अध्यक्ष, जनहित विकास मंच