उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी बाजूकडे जाणाऱ्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात जलपर्णी गवत, गाळ, बाटल्या, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर अडकला आहे. यामुळे पाण्याच्या अति दाबाने हा बंधारा वाहून जाण्याची भीती कोरेगाव मुळ, बिवरी व अष्टापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याच्या अगोदर नदीतील जलपर्णी व कचरा काढून घेण्याची गरज होती. मात्र त्यांनी कोणतीही काळजी न घेतल्याने सदरचा बंधारा निर्जीव होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बंधाऱ्याच्या बाजूचा भराव अगोदरच पूर्णपणे वाहून गेला आहे.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा- मुठा नदीला सोडण्यात आले आहे. जास्त झालेले पाणी नदीच्या पात्रात सोडल्यामुळे नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोरेगाव मूळ या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे दळण वळण थांबले आहे. नदीपात्रात पाणी जास्त झाल्यामुळे कचरा व जलपर्णी ही बंधाऱ्याला अडकली असून यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या बाजूला असलेला पूर्वेकडील बाजूचा मुरूम अगोदरच वाहून गेला आहे. पुलाच्या कडेला मोठ्या दऱ्या निर्माण झाल्या होत्या. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून बिवरी-कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळील नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी आली आहे. तसेच झाडे झुडपे वाढल्याने त्याची ताकद कमी झाली आहे. बंधाऱ्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांची अडचण होणार आहे.
याबाबत बोलताना माजी सरपंच विठ्ठल शितोळे म्हणाले, “या अगोदर पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अधिकारी मात्र नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत. बुधवारी (ता. 24) सकाळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले होते. परंतु, नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाढल्याने निघून गेले. ही कामे पावसाळा सुरु होण्याच्या अगोदरच होण्याची गरज होती.”
याबाबत पुरंदर उपसा सिंचन योजनेचे महेश कानिटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.