उरुळी कांचन, (पुणे) : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कलमान्वये निर्बंधांचे आदेश जारी केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या आचारसंहितेदरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शांतता, निर्भय व न्यायपूर्ण वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यासाठी विविध कलमान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत. अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.
कोणत्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे वा मेळाव्यांचे आयेाजन करण्यावर निर्बंध राहणार आहेत. परिसरातील नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम अॅप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, डीप फेक, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. कोणाचेही विरोधात घोषणाबाजी, डीजे, फटाके, रंग, गुलाल उधळणार नाही किंवा वाजणार नाही याची काळजी घेण्यात यावी. पोलिसांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत.
व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत, जर अॅडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, निवडणूक काळासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींसाठी पोलीस परवानगी बंधनकारक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.