पुणे : नव्या वर्षाची चाहूल लागताच वर्षातील पहिला मोठा सण म्हणजेच मकर संक्रांती उत्सवाचे वेध लागतात. प्रयागधाम येथे मकर संक्रांती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्सवासाठी हजारो भाविक प्रयागधाम येथे जातात. उत्सवाला जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी काही रेल्वे गाड्यांना उरुळी कांचन स्थानकावर तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी गाड्यांना २७ डिसेंबर ते पुढील वर्षी १७ जानेवारी या कालावधीत एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात येणार आहे.
उरुळी कांचन स्थानकावर तात्पुरता थांबा मिळणार असलेल्या गाड्या
वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस, म्हैसूर-हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, यशवंतपूर- चंडीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस, चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेस, पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे-लखनौ एक्स्प्रेस, लखनौ-पुणे एक्स्प्रेस, दौंड-इंदूर एक्स्प्रेस, इंदूर-दौंड एक्स्प्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस या गाड्यांना उरळी कांचन स्थानकावर तात्पुरता थांबा असेल. याचबरोबर पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसमधील सामान्य वर्गाचा एक डबा १५, १६ आणि १७ जानेवारीला उरुळी स्थानकावर प्रवाशांसाठी उघडण्यात येईल.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी पुणे विभागातील दौंड मार्गाची पाहणी केली. त्यांनी लोहमार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेड इक्विपमेंट यासह विविध सुरक्षा उरपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.