Wagholi Crime पुणे : वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १२७९ मधील ६० बनावट जमीन खरेदीखत करून बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनीर अब्दुल शकुर शेख (रा. अंधेरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मीना बुलचंदानी यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी यांचे पती दयाल तिलकचंद बुलचंदानी यांच्या नावावर वाघोली येथील गट क्रमांक १२७९ मध्ये ६० गुंठे जमिन आहे. मुलचंदानी हे हाँगकाँग येथे पत्नी मीना यांच्यासह राहत होते. सन २०२१ मध्ये दयाल यांचे निधन झाले.
दयाल यांचे निधन झाल्यानंतर वाघोली येथील ६० गुंठे जमिनीच्या सातबारा नोंदीबाबत मुनीर अब्दुल शकुर शेख याने तलाठी कार्यालयात अर्ज दिला आहे. असे फिर्यादी यांना समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ शेख यांनी सादर केलेल्या खरेदीखताची नंबरद्वारे माहिती काढली असता. मूळ खरेदीखत हे बिबवेवाडी येथील इमारतीच्या फ्लॅटचे असल्याचे समजले. तसेच आरोपी मुनीर शेख (रा. अंधेरी) याने बनावट खरेदीखत तयार करून ते खरेदी खत वाघोली तलाठी कार्यालयात सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दिले असल्याचे समजले.
त्यानंतर फिर्यादी मीना मुलचंदानी यांनी तातडीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर सदरचा फेरफार रद्द करण्यात आला. तर आरोपी मुनीर शेख याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी बनावट खरेदीखत तयार करून जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव लावण्याच्या प्रयत्नाची घटना वाघोली येथील गट नंबर १२७९ मध्ये घडली होती. त्यापाठोपाठ केसनंद रोड लगतच्या जमिनीबाबतही अशाचप्रकारे खोटे खरेदी खत तयार करून सातबाऱ्यावर नाव लावल्याची घटना घडली होती. दोन्ही प्रकाराबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली व परिसरातील गावांमध्ये पूर्वीच्या काळी अनेकांनी जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. बहुतांश जमिनी तशाच मोकळ्या पडल्या आहेत किंवा मूळ मालक परगावी रहात असल्याचा फायदा घेऊन बनावट खरेदीखताद्वारे सातबाऱ्यावर नावे लावली जात आहे. अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत अजून घडत आहेत. त्यामुळे वाघोली परिसरातील मोकळ्या जमिनीबाबत मालकांना सतर्क राहावे लागणार आहे.