उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मानवी शरीरास बाधक वातावरण तयार झाले आहे. काही दिवसांपासून ‘व्हायरल इन्फेक्शन’ची साथ पसरली असून, यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामीण व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे.
परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया, थंडी, ताप, खोकला आदींसह विविध प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांचे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. साथीच्या आजारांमुळे खासगी व शासकीय ग्रामीण रुग्णालये रुग्णाच्या गर्दीने भरली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विषाणूंच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे व्हायरल ताप, सर्दी, खोकला यांचेही रुग्ण वाढत आहेत. शहरात स्वाईन फ्लूची रुग्ण संख्या वाढली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, लहानांपासून वृद्धांपर्यंत संसर्गजन्य आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे समजून त्यानुसार उपचार करण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. शहरात डेंग्यू व चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत असले, तरी ते प्रमाण कमी आहे. वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत व ठप्प करणारे ठरत आहे.
डेंगीची लक्षणे..
-डेंगीची लागण झाल्यास सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होते.
-अचानक थंडी वाजून ताप येणे
-शरीरावर पुरळ
-नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होणे
-मळमळ, उलटी आणि लघवीद्वारे रक्त येणे
-सतत तहान लागणे आणि अशक्तपणा येणे.
व्हायरल तापाची लक्षणे..
-व्हायरल तापादरम्यान शरीराचे तापमान वाढते
-संपूर्ण शरीरात वेदना होतात
-थंडी वाजणे, खोकला व नाक वाहणे अशा तक्रारी जाणवणे
-तीव्र डोकेदुखी
– काही नागरिकांच्या त्वचेवर पुरळ येण्याची समस्या असू शकते
“सर्वसाधारणपणे सध्या थंडी, ताप व सर्दी आजाराचे रूग्ण अधिक आहे. शहरात स्वाईन फ्लूची रुग्ण संख्या वाढली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व अशक्तपणा पाच दिवसांपेक्षा अधिक असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करायला हवेत. घरगुती उपाय न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. समीर ननावरे, गणराज हॉस्पिटल, उरुळी कांचन, (ता. हवेली)“सध्या उरुळी कांचनसह परिसरात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत चालले आहेत. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सध्या जास्त आहेत. त्याच्यासोबत डोकेदुखी आणि थंडी वाजणे हे एक लक्षण आहे. बाहेरील खाणे टाळावे व घरगुती उपाय न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच पाणी उकळून प्यावे, रुग्णांनी वेळेवर उपचार घेतला तर तत्काळ आराम मिळतो.”
डॉ. गणेश ताठे, सिद्धिविनायक हॉस्पिटल, उरुळी कांचन (ता. हवेली)