निंबुत (बारामती): परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया, अंग दुखणे, जुलाब या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, आरोग्य विभाग व निंबुत ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. निंबुत येथील उपआरोग्य केंद्र गेल्या तीन वर्षांपासून सतत बंद अवस्थेत असून, या उपआरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर, नर्स नसल्याने नागरिकांना उपचार घेण्यासाठी नीरा येथील खासगी दवाखान्यात जावे लागत आहे.
वारंवार मागणी करूनसुद्धा साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात राजकीय वारसा लाभलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निंबुत या गावाच्या उपकेंद्राला डॉक्टर, नर्स मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.