लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी मंदिरातील १०० रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे.
याबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टला नाशिकमधील भाविक कैलास दळवी यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य व माजी सरपंच कैलास दळवी हे १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिरात शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा फलक त्यांना दिसून आला.
दरम्यान, दळवी यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत चिंचवड देवस्थानास नोटीस बजावली. पैशाच्या आधारे भेदभाव करणे हे राज्यघटनेशी विसंगत असल्याचे नोटिसीत म्हटले होते.
कोणामध्ये भेदभाव करणे हा आमचा हेतू नव्हता
चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस म्हणाले, याबाबत एक नोटीस मिळाल्याची माहिती खरी आहे. व्हीआयपी दर्शन सुविधा तात्काळ बंद करण्यात आली आहे. व्हीआयपी हा शब्द बंद केला आहे. मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी तात्काळ दर्शन व सुलभ दर्शन देण्यासाठी दर्शन पास मिळतात. या संदर्भात सर्वजण मिळून विचार करणार आहोत. तसेच कोणामध्ये भेदभाव करणे हा आमचा हेतू नव्हता व नसेलही, असेही त्यांनी सांगितले.