उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांच्या रडारवर आहेत. गावठी दारू अड्डे, मटका-जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक छापासत्र सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये ३६ अवैध धंद्यांवर धाड टाकली असून, सर्वाधिक अवैधरित्या गावठी दारुचे अड्डे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूचे प्रमाण कमी झाले असले, तरी दुसरीकडे गावठी दारूची बेकायदा विक्री वाढली आहे. गावागावामध्ये अनेकजण गावठी दारूचा साठा करून त्याची विक्री करत आहेत. कोठेही आडोशाला दारूसाठा ठेऊन त्याची विक्री केली जाते. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
मागील दीड ते दोन महिन्यांच्या कालवधीत पोलिसांनी अवैध गावठी दारुविक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई करत हातभट्टी, देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे. यात सर्वाधिक संख्या उरुळी कांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ येथील असून, ७ ठिकाणचे जुगार-मटक्याचे अड्डेही पोलिसांनी कारवाई करत उद्धवस्त केले आहेत.
तब्बल साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव मूळ, शिंदवणे, सोरतापवाडी, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गावठी दारुचे अड्डे व एका कारवाईमध्ये मागील दोन महिन्यात तब्बल १० लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच देशी विदेशी, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात धाडसत्र राबवून हजारो रुपयांचा जुगार-मटक्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. बेकायदा दारू विक्रीबद्दल पोलिस दलाकडून अधिक कारवाया केल्या जात आहेत. परंतु ज्या विभागाची जबाबदारी आहे, त्या उत्पादन शुल्ककडून कारवाईचे प्रमाण कमी आहे.
यापुढेही अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार
“सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील. रेकॉर्डवरील आरोपी यांच्यावर आरोपी दत्तक योजना, एक पोलीस, एक आरोपी योजना, रेकॉर्ड असणारे आरोपीवर प्रतिबंधक कारवाई सुरु आहे. गुन्हेगारांनो, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. यापुढेही अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे”.
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन ग्रामीण पोलीस ठाणे.
पोलिसांची कारवाई
दारूअड्डा – 26
जुगार – 7
कोयता – 2
दरोडा – 1
लूटमार – 1