लोणी काळभोर : संपूर्ण देशामध्ये “२४ डिसेंबर” हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून मोठ्या उत्साहात शासकीय पातळीवर साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हवेली तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये “गाव तेथे ग्राहक तक्रार निवारण कक्ष” स्थापन करून एक अनोखा ग्राहकाभिमुख उपक्रम शासनाने सुरु करावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप शिवरकर यांच्याहस्ते निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी नायब तहसीलदार संजय भोसले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे , संघटक गणेश सातव , सचिव कैलास भोरडे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सचिन सुंबे, कोषाध्यक्ष सुरज वाळके, शिवाजी फरांदे, अनंता उबाळे, जीवन सुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, ग्राहक पंचायत हवेली तालुक्याची मासिक बैठक राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त (२४ डिसेंबर ) पेरणे (ता. हवेली) येथे संपन्न झाली. यावेळी बैठकीचे मार्गदर्शक पुणे जिल्हाचे संघटनमंत्री भानुदास सरडे व पुणे जिल्हाचे कोषाध्यक्ष राघवदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये ” गाव तेथे ग्राहक तक्रार निवारण कक्ष ” स्थापना करणेबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत शासनाशी पत्र व्यवहार करावा असे ठरले. त्यानुसार हवेलीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना संघटनमंत्री भानुदास सरडे म्हणाले कि, या कक्षादवारे प्रत्येक गावामध्ये ग्राहक प्रबोधन , शेतकरी ग्राहकांच्या अडचणी, समस्या शेतकऱ्यांची होणारी अडवणूक व फसवणूक अशा प्रकारच्या तक्रारींचे निवारण, ग्राहकांची जनजागृती, हक्क, कर्तव्य, होणारी फसवणूक कशी टाळावी. यासाठी या कक्षाचा शासनास फार मोठा मदतीचा हातभार लागणार आहे.
यावेळी बोलताना संदीप शिवरकर म्हणाले, गावामधील ग्राहक तक्रार निवारण कक्षामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी, ग्राहक चळवळींमधील एक कार्यकर्ता व गावामधील इतर शासकीय कर्मचारी अशी समिती स्थापन केली पाहिजे आणि प्रत्येक महिन्यातील एक दिवस ठरवून त्या महिन्यातील तक्रारींचे निवारण करून गावातील प्रश्न गावातच सुटण्यास मदत होईल, असा अनोखा ग्राहकाभिमुख उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरू शकेल, असे शिवरकर यांनी सांगितले.