पिंपरी: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अजित गव्हाणे भोसरी विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. माजी आमदार विलास लांडे यांनी व त्यांच्या गटातील सर्व माजी नगरसेवकांनी त्यांना साथ दिली होती. मात्र, निवडणुकीत पराभवानंतर पुन्हा लांडगे आणि गव्हाणे यांच्यासह हा संपूर्ण गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहण्याच्या भूमिकेत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ते पक्षात येण्याच्या मार्गावर असून त्यांना आम्ही पक्षात घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित गव्हाणे आणि २० नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात गेले होते. अजित गव्हाणे आणि नगरसेवकांनी विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचा देखील त्यांनी जाहीर केले होते. महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत भोसरीमध्ये विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.
या निवडणुकीत गव्हाणेंना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेकांनी पुन्हा अजित पवारांसोबत राहण्याची भूमिका स्विकारली आहे. त्याची सुरुवात विलास लांडे यांच्यापासूनच झाली. लांडे यांच्यासह अजित गव्हाणे आणि इतर माजी नगरसेवक पुन्हा घड्याळ हाती घेणार असल्याची चर्चा सतत सुरू आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष बहल यांनी भोसरीतील लांडे, गव्हाणेंचा गट पक्षात येणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. ते म्हणाले की, विलास लांडे आमच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबतचे गव्हाणे आणि इतर माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षात येण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, त्यांना आम्ही पक्षात घेणार आहोत.
चुकीच्या कामाबद्दल माहिती घेणार
महापालिकेत सुरू असलेल्या चुकीच्या कामाबद्दल माहिती घेतली जाईल. ज्या कामांमध्ये आयुक्त किंवा प्रशासनाकडून चुकीचे काही सुरु असेल. त्यावर योग्य भूमिका पक्षाकडून यापूर्वी मांडलेली आहे. यानंतरही मांडली जाईल, असे बहल यांनी म्हटले. तसेच, खासदार सुनेत्रा पवार यांनी लक्ष घातल्याने शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिलासा मिळाल्याचेही ते म्हणाले.