पुणे : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यावरून बऱ्याच चर्चादेखील सुरू होत्या. याच पत्रावरून शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ते पत्र विरोधकांनी लिहिलेले होते. आमचा शिवसैनिक माझ्याबद्दल काही पत्रबित्र लिहित नाही. त्याला भांडायचे असेल तर तो माझ्याकडे येऊन भांडतो’, असे ते म्हणाले.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवतारेंनी हे विधान केले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपुमख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सासवडला सभा होणार आहे. ही जनसंवाद आणि शेतकऱ्यांशी संवाद सभा आहे. एखादी गोष्ट युद्ध करून जिंकून मिळवता येते. पण तहात ती गोष्ट मिळाली तर युद्ध करण्याचे कारण नाही. एअरपोर्ट, गुंजवणीचे पाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. त्या स्वतः मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेला सांगतील. माघार घेताना काय-काय ठरले हे स्वतः ते सांगतील. ५० हजार लोकांच्या क्षमतेइतकी मोठी ही सभा होईल’.
तसेच एवढी चर्चा झाल्यानंतर आता तशी काही अपेक्षा नाही. पण त्यांना जे वाटेल ते-ते बोलतील. पाच वर्षे प्रकल्प लेट झाले, त्यांनी वेगळा सूर धरला ठीक आहे. पण आता त्याला चालना मिळत आहे. पाच वर्षात जी कामे झाली नाहीत ती एका वर्षात करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाप जसा शिव्या देतो तसा मी…
पत्रावर सविस्तर प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले, ‘बाप जसा शिव्या देतो, ओरडतो, मारतो, थोबाडीत देतो, तेवढे सुद्धा मी करतो. ते रिलेशन आमचे वेगळे आहे. ते पत्र विरोधकांनी लिहिलेले होते. आमचा शिवसैनिक माझ्याबद्दल काही पत्रबित्र लिहित नाही. त्याला भांडायचे असेल तर तो माझ्याकडे येऊन भांडतो’, असेही त्यांनी म्हटले आहे.