पुणे : बारामतीच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असल्याचे जवळ-जवळ स्पष्ट झालं आहे. अशातच आता विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. आता विजय शिवतारेनीही त्यांची भेट घेत जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी भावनिक साद घातली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी 40 वर्षांच्या राजकीय वैर बाजूला ठेवून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांना लोकसभेच्या निवडणुकीत साथ देण्यासाठीच पवारांनी ही भेट घेतली होती. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर एक बैठक पार पडली, या बैठकीत संग्राम थोपटे यांनी आपण सुप्रिया सुळे यांनाच निवडून देऊ असं स्पष्ट केलं होतं.
विजय शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट
शरद पवारांच्या भेटीनंतर आता विजय शिवतारेंनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी थोपटेंशी बोलताना ते म्हणाले की, पवारांच्या विरोधात असलेल्या मतदारांना मी साथ देणार आहे. हा लोकशाहीतील वाद असल्याने विरोधातील लोकांनाही संधी देणं आवश्यक आहे. शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं.
अजित पवारांनी जाहीर सभेत आपली लायकी काढली होती. पुरंदरचे लोक म्हणतात की आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही. दुश्मनी राहिली बाजूला, मी यांना माफ केलं, पण जनता माफ करणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत. यावेळी अनंतराव थोपटे यांनी विजय शिवतारे यांना पुरंदरची स्थिती काय असा प्रश्न विचारला. त्यावेळी पुरंदर सर्व आपल्या मागे आहे, असंही शिवतारे म्हणाले आहेत.