Vasu Baras 2023 : पुणे : हिंदू संस्कृतीत गाईला खूप महत्त्व आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि म्हणून गाईचं वसुबारसला पूजन करणं महत्त्वाचं आहे. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस असतो. आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी असते. दिवाळीत राम सीता त्यांचा वनवास संपवून अयोध्येत आले होते.अशा वेळी दिवाळी नेमकी साजरी कशी करायची? आणि या इंग्रजी महिन्यात ही दिवाळी कोणत्या दिवसापासून सुरु होते आणि कशा पद्धतीने साजरी करावी? ते समजून घेऊयात.
दिवाळीचा पहिला दिवस कोणता?
यावर्षी दिवाळीची पहिली पणती लावावी ती वसुबारसच्या दिवशी. 9 नोव्हेंबरला वसुबारस सण साजरा होतोय. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन करावं. गाईच्या पायावर पाणी घालणे. तिला ओवाळणे. तिला गंध लावणे, चारा खायला घालणे आणि तिचा सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य देणे काही दक्षिणा देणे अशा प्रकारचा हा छोटासा विधी आहे.
काय आहे वसुबारसची प्रथा?
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे.