पुणे : मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, असा टोला वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल पुण्यात वसंत मोरे यांच्यावर टीका केली होती. वसंत मोरे आणि ‘वंचित’ हे काही गणितच मला कळत नाही, वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, यांची कलाकारी मला समजली नाही, मी पण कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतात, ‘मुरली’ची मुरली वाजावी असं तर त्यांच्या मनात नाही ना? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर वसंत मोरेंनी पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले वसंत मोरे ?
वसंत मोरे म्हणाले कि, मला लोक चेहऱ्याने ओळखत नाही तर, वसंत मोरेंचे विकास कामं प्रकाश आंबेडकरांना माहिती आहेत. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून मला उमेदवारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे कलाकार आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे. आव्हाड नेमके कसे कलाकार आहेत, हे सगळ्या राज्याला माहित आहे. निष्ठावान होतो आणि आहे. मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, असं वसंत मोरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, चांगल्या प्रतीचा माझा प्रचार सुरु असून मला प्रतिसाद चांगला मिळत आहे. मी आज नाही गेली चार वर्षे सातत्याने कोरोना कालावधीनंतर शहरांमध्ये काम करत आहे. मी आजपर्यंत चार वर्षांमध्ये विकासासाठी भरपूर काम केले. पुणे शहरातील प्रश्नांवर सातत्याने पुढे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल किंवा रस्त्यावरती असेल मी आवाज उठवलेला आहे. त्यामुळे पुणेकरांना मी माहिती आहे. ते मलाच निवडणून देतील, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
माझ्या वार्डाची सहल करून आणतो
जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचं काम बघायची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवक आहे. तिथे पंधरा वर्षात मी केलेले काम पाहायचे असेल तर आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून त्यांना मी आणतो. मग वसंत मोरेचं काम काय, किती लोकांनासाठी काम करतो हे कळेल असं यावेळी वसंत मोरे म्हणाले.