Pune Vasant More News : पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे हे कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात. अशातच आता वसंत मोरे यांनी मंगळवारी रात्री १२ वाजता एक पोस्ट करुन उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो.. असं म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. वसंत मोरेंच्या या पोस्टची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. वसंत मोरे पक्षाला रामराम करणार का? याच्याही चर्चा सुरु आहेत.
पुण्यातले मनसेचे धडाडीचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. एखादी समस्या आली, कुठे काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला, समस्येला वाचा फोडतात हे बऱ्याचदा दिसलं आहे. याच कारणामुळे वसंत मोरे पुण्यासह इतर ठिकाणीही प्रसिद्ध आहेत. इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना पक्षात कुणाचा त्रास होत आहे? त्यांची ही खदखद अशी का बाहेर येत आहे? हे प्रश्न आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे उपस्थित होत आहेत.
लोकसभा निवडणुकांसाठी दोन-तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे मनसे पक्षातली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आपल्याला कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, असं म्हणत वसंत मोरे यांनी खेद व्यक्त केला आहे.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट
”एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो…
त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो…”
अशी पोस्ट मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून ते काही वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.