केडगाव: दौंड तालुक्याच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील कांदा पिकावर दूषित हवामानाचा परिणाम झाला आहे. पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत खर्चात मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकर्यांनी लावलेल्या कांदा पिकास आता जवळपास एक ते दीड महिना झाला आहे. सुरुवातीपासूनच कांद्याला दुषित हवामानाचा सामना करावा लागतोय.
सततचे ढगाळ हवामान, थंडीचे कमी-अधिक प्रमाण यामुळे कांदा पिकावर मावा, रसशोषित किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकाच्या पाती पिवळ्या पडल्या आहेत. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, खर्चात मोठी वाढ झाली आहे. कांदा रोपे, लागवड, मजुरी यासाठी शेतकर्यांना अगोदरच मोठे भांडवल गुंतवावे लागले आहे. आता औषध फवारणीचा खर्च वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
कांदा लागवडसाठी लागणारी शेतीची मशागत, रोपे, लागवडीसाठी लागणारी मजुरी, औषधे, खते यासाठी लागणारा खर्च व कांदा विकून मिळणारे पैसे यामध्ये मोठी तफावत असते. सरकारने कांद्याचे बाजार वाढले असता निर्यात बंदी केली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ही निर्यात बंदी उठवावी व अनुदान योजना देखील सुरु करावी.
राहुल ठोंबरे – शेतकरी(कासूर्डी) दौंड