उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन जवळ असलेल्या वळतीसह (ता. हवेली) परिसराला बुधवारी (ता. १५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. शेतातील पिकांसह राहत्या घरावरील पत्रे वादळात उडून गेले. रस्त्यांवर तसेच शेतात असलेली आंब्याची मोठी झाडे मोडून पडली. विजेचे खांब वाकल्याने विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
नुकसान झालेल्या शेतमालाची व पडझड झालेल्या घरांचा तलाठी व मंडलाधिकारी यांनी पंचनामा करावा, अशी मागणी वळती येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कुंजीर, शिवाजी कुंजीर, व पोलीस पाटील मोहन कुंजीर यांनी केली आहे.
याबाबतीत काही शेतकरी व नागरिकांनी संबंधित ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, कृषी अधिकारी यांना फोनवरून नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सात वाजेपर्यत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने या ठिकाणी पंचनामा तर दूरच साधे विचारपूस करायला आले नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी दिली.
बुधवारी रात्री उरुळी कांचन, वळती या गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. वळती येथील गोकुळ कुंजीर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. राजाराम कुंजीर यांच्या शेतातील टोमॅटोचे पीक उध्वस्त झाले आहे. रोहिदास बबन कुंजीर यांचा ऊस लोळला आहे. तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले, तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रसाद कुंजीर यांची आंब्याच्या झाड उन्मळून पडले आहेत. शिवाजी कुंजीर यांचा काढणीस आलेला पालक वादळामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. भैरवनाथ मंदिराजवळ असणारे पत्रा शेड उडून गेले आहे. इतर अनेक शेतकऱ्यांचे पालेभाजी, फळझाडांचे नुकसान झाले आहे. अंकुश कुंजीर यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की ठिकठिकाणी मोठी झाडे कोसळली. बहुतांश ठिकाणी वादळात विद्युत खांब व तारा तुटल्याने काल रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
वळती येथील शेतकरी अंकुश शंकर कुंजीर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर शिवाजी कुंजीर यांच्या घरावर झाडे पडल्यामुळे घराला तडे गेले आहेत. तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वळतीतील नागपुरे वस्ती वरचा मळा, वळती गाव, व परिसरात शेतातील पिकांचेही नुकसान झाले आहे.
शासनातर्फे तातडीने घराचे व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई द्यावी,
किरण कुंजीर शेतकरी, वळती, ता. हवेली