पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील वैदूवाडी, रामटेकडी पुलाजवळ एका व्यक्तीने स्कूल बसवर निष्काळजीपणे दगड फेकून मारला. या दगडफेकीत बसची डाव्या बाजूची काच फुटली. यामुळे बसमधील महिला जखमी झाली. ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी योगेश ज्ञानेश्वर कांबळे (वय ३२ वर्षे, रा. वैदूवाडी, हडपसर) याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे बस मालक जयदीप निकम (वय ३६, साडेसतरानळी, हडपसर) नोंदवलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मालक निकम यांच्या मालकीची स्कूल बस (क्र. एम.एच. १२ आर एम २९५८) चालक अंकुश विक्रम थोरवे (वय २४) हा नेहमीप्रमाणे अॅमनोरा मॉल ते कोंढवा या मार्गे घेऊन जात होता. वैदवाडी ब्रिज चढत असताना अचानक योगेश कांबळे याने निष्काळजीपणे दगड फेकून मारला. या दगडफेकीत बसची डाव्या बाजूची काच फुटली. यामुळे बसमधील महिला मंगल हटकर (वय ३९) यांच्या हाव्या हाताला दुखापत झाली.
या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली. हडपसर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.