उरुळी कांचन, (पुणे) : संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्याच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
वैभव (माऊली) बाळु भोगल (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गाव बोरगाव, ता. करमाळा, सोलापूर) पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे मोठ्या भावनेने सांगत आहे. विशेष म्हणजे कोणतेही अॅकॅडमी व महागडे क्लासेस न करता घरी अन् मित्रांसोबत राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे.
उरुळी कांचन पासून जवळच असलेल्या सोरतापवाडी येथे 27 वर्षापूर्वी आई – वडील हे कामानिमित्त आले होते. दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी केली. व दोन मुलांना शिकवले. यातील वैभवचे प्राथमिक शिक्षण सोरतापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे तर 5 वी ते 10 वीचे शिक्षण नायगाव येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात झाले. 11 वी 12 चे उच्च माध्यामिक शिक्षण करमाळा येथील महविद्यालयात विज्ञान शाखेतून झाले. जेएसपीएम या कॉलेजमध्ये मॅकेनिकल्स इंजिनिअरची पदवी घेतली.
चाकण येथे सहा महिने नोकरी केली. मात्र पोलीस अधिकारी होण्याचे वेध लागले. त्यामुळे ते काम काही महिन्यातच सोडून दिले. घरची परिस्थिती बेताची पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आणि त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला. 2018 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि अभ्यास सुरु असताना 2020 मध्ये कोरोनासारखा महाभयंकर आजार आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कोणतीही शिकवणी न लावता भावाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरु ठेवला.
दरम्यान, प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात वैभवने अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन केल्या. मात्र तरी देखील न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला. या काळात त्याच्यातील हरहुन्नरीपणा, जिद्द व चिकाटी बघून आई-वडिलांनी व त्याच्या मोठ्या भावाने आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले.
“मला लहान पणापासून पोलिस वर्दीची आवड अन् आकर्षण होते. घराच्या परिस्थिती मुळे इंजिनिअर झालो. पण मन रमले नाही. माझ्या यशात आई – वडिलांचा व मोठ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे. आर्थिक परिस्थिती बघून मी कोणताही क्लास लावलेला नाही स्वतः अभ्यास केला व एमपीएससीचा पेपर दिला व दुसऱ्याच प्रयत्नात पास झालो.”
– वैभव (माऊली) बाळु भोगल, पोलीस उपनिरीक्षक