उरुळी कांचन, (पुणे) : केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी नागरिकांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक असल्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पोलीस ठाण्यात “वाचन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यात येणाऱ्या शेकडो नागरिकांना किमान अर्धा तास आपल्या आवडीची पुस्तके वाचायला मिळणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारण्याच्या अभियानांतर्गत या “वाचन कट्टा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 09 गावामध्ये भेट देणाऱ्या नागरिक, अभ्यागत, तक्रारदार, पीडित, अधिकारी व अंमलदार यांना वाचनाकरिता, त्यांच्या वेळेचा सदुपयोग होणार आहे. यासाठी ‘वाचन कट्टा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या कट्ट्यावर विविध विषयांची पुस्तके ठेवण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली. सदरचे उपक्रमामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले, प्रविण कांबळे, अनिल खोमणे, पोलीस हवालदार कमलेश होले, विशाल रासकर, सुजाता भुजबळ, अजित काळे, राजकुमार भिसे, उमेश जगताप, बंडू बालगुडे, सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुस्तके भेट देण्याचे आवाहन..
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामांकित पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या नागरिकांनी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या वाचन कट्टा उपक्रमाला भेट देऊन नवविचार, सकारात्मक विचारसरणी, ऐतिहासिक, लहान मुलांनाची आवड निर्माण होईल अशी गोष्टीची पुस्तके, थोर विचारवंत, प्रेरणादायी व्यक्ती, आदर्शवत व्यक्ती यांचे विचार पुस्तके भेट देण्यात यावीत असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
“वाचन कट्ट्यात’ अभ्यासक्रमासह गोष्टी, कविता, कादंबरी, चित्रप्रदर्शन, थोर विचारवंत, प्रेरणादायी व्यक्ती, आदर्शवत व्यक्ती तसेच दररोजचे वर्तमानपत्र याठिकाणी वाचनासाठी ठेवण्यात येणार आहे. सदर उपक्रमामुळे पोलीस ठाणे व जनता यामध्ये चांगला सुसंवाद वाढण्या मदत होईल, येणारा प्रत्येक तक्रारदार, पीडित, वाचकांच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा, दृष्टिकोन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पोलीस ठाणे व सामान्य नागरीक यांच्यातील संवाद वाढणार आहेत.
शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे
उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत वाचन कट्टा हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये सलोखा प्रस्थापित करणारा,अभिनव आणि आदर्श उपक्रम पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सुरू केलेला आहे. यामुळे ज्या नागरिकांना वाचनाची आवड आहे किंवा मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे, त्यांच्यासाठी साहित्याचा मोठा खजिना उपलब्ध होणार आहे. तसेच पोलीस आणि नागरिकांमधील एक दरी कमी होऊन मैत्रीपूर्ण संवाद झाल्यास, वाचन कट्टा हा सामाजिक हितासाठी सकारात्मक उपक्रम ठरु शकणार आहे.
विकास जगताप, उपाध्यक्ष, व्यापार आघाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश