उरुळी कांचन, (पुणे) : एंगेजमेंट अॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीतून दुपारून सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात दुचाकीने पाठीमागून ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऋषिकेश विजय गायकवाड (वय- 27, रा. गोसावी वस्ती, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा मांजरी येथील नामांकित सिरम या कंपनीत कामाला होता. तर, त्याचे वडील हे टेल्को या कंपनीत कामाला आहेत. ऋषिकेश याचा मागील तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. कामावर तो रोज बसने ये-जा करीत होता. आज बुधवारी एंगेजमेंट अॅनिवर्सरीचे साजरी करण्यासाठी ऋषिकेश याने दुपारून सुट्टी घेतली होती. तसेच आज तो दुचाकी घेऊन कंपनीत आला होता.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतिल वाकडा पूल या ठिकाणी उरुळी कांचनच्या बाजूने जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ऋषिकेश याच्या डोक्याला व अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या.
दरम्यान, त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच ऋषिकेश याचे लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, असा परिवार आहे. फुरसुंगी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव आबा सायकर यांचे बंधू मुरलीधर सायकर यांचे ते जावई होत.
उरुळी कांचन पोलिसांचा हद्दीवरून गोंधळ
नायगाव – पेठ गावाकडे जाणाऱ्या सोरतापवाडी हद्दीतील वाकडा पूल परिसर हा उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलिसांना अपघाताची माहिती दिली असतानाही रुग्णालयात येण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास लागत आहेत. याअगोदरही कोरेगाव मूळ येथील एका रेल्वे अपघात प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी हद्दीवरून वाद घातला होता. नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांना विनंती करून हा वाद मिटवला होता. मात्र, आज पुन्हा वाकडा पुलावर अपघात झाला. यावेळीही पोलीस दोन तासांपेक्षा जास्त वेळ झाला, तरी घटनास्थळी दाखल झाले नाहीत. ग्रामीण पोलिसांच्या या नेहमीच्या हद्दीच्या गोंधळाने मयत झालेल्याच्या नातेवाईकांना अधिक त्रास सहन करावा लागतो, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावर पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांनी एकत्र बैठक घेऊन एकच हद्द ठेवत तोडगा काढण्याची मागणी होत आहे.