उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन रेल्वे स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात असून कचरा व दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत उरुळी कांचन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा शुभारंभ ऑगस्ट २०२३ मध्ये झाला. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आधुनिक सुविधांसह स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकात परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
सध्या रेल्वे स्थानकावर मूलभूत स्वच्छताही करण्यात येत नाही. प्रतीक्षालयातील शौचालये, खुर्च्या येथे घाण आहे. अस्वच्छतेमुळे प्रवासी जायला नको म्हणतात. फलाटावर, ब्रिजवर कचरा साठला आहे. कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. महिला स्वच्छतागृह बंद पडले आहे. त्यामुळे, प्रवाशांना ‘वाली’ राहिला नसल्याचे सध्या उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे.
उरुळी कांचन रेल्वे स्थानकावरून दिवसभरात असंख्य नागरिक प्रवास करत असतात. रेल्वे स्थानकावर दोन फलाट आहेत. दर महिना ५० हजारापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. अनेक एक्स्प्रेस, डेमू व मालगाड्या धावतात. दरमहा सुमारे लाखो रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न या रेल्वे स्थानकावरून मिळत आहे. असे असतानाही या स्थानकातील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाची साफसफाई न केल्यामुळे दररोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उरुळी कांचनसह दौंड, पुरंदर, सासवड, व आसपासच्या गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून या भागात शहरीकरण व औद्योगिकीकरण झपाट्याने विकसित झाले आहे. त्यामुळे, येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या स्थानकाच्या परिसरात नामांकित महाविद्यालय, जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळा आहेत. त्यामुळे, प्रवाशांना रेल्वे हा उत्तम पर्याय ठरला आहे. परंतु, हे रेल्वे स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. प्रवाशांची सुरक्षा ‘रामभरोसे’ आहे.
दरम्यान, भुरट्या चोरांचा सुळसुळाट, गर्दुल्यांचा अड्डा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे उरुळी कांचन रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे चित्र आहे. तसेच सकाळी सकाळी रेल्वे स्थानकाच्या तिकीटगृहाजवळ सात ते आठ जणांचा घोळका धूम्रपान करताना आढळतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुरूष, कामगार, विद्यार्थी व महिलांना स्वच्छतागृह खराब-बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. तसेच शेजारीच रेल्वे कर्मचारी चाळ आहेत. त्याठिकाणी भिंतीच्या आडोशाला मागील अनेक दिवसांपासून आजूबाजूचे लोक कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने, ऊरळी कांचन ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच या ठिकाणी टाकलेला कचरा लवकर उचलून घेऊन जावा अन्यथा रेल्वे स्टेशन परिसरातील लोकांना एकत्रित करून लवकरच आंदोलन करणार आहे.
उमेश म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते
दौंड बाजूकडे जाणाऱ्या बाजूकडील स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणावरील स्वच्छतागृह तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आले आहे. उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या साईडचे स्वच्छतागृह स्वच्छ आहे. ज्या नागरिकांना जायचे आहे ते नागरिक कार्यालयातून चावी घेऊन जातात. परत आणून देतात. मात्र काही नागरिक स्वच्छता गृहात जाणून बुजून दगड टाकीत आहेत.
मनोज सलोदकर, मुख्य प्रबंधक, उरुळी कांचन, रेल्वे स्थानक
सदर ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात येईल, याबाबत सरपंच व सदस्यांना माहिती देणार आहे. याबाबत उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
प्रकाश गळवे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी, उरुळी कांचन, (ता. हवेली)