उरुळी कांचन (पुणे) : विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना उरुळी कांचन पोलिसांनी तब्बल बारा तासांपेक्षा अधिक काळ पोलिस ठाण्याच्या आवारात ताटकळत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुनम चौधरी यांच्या हस्तक्षेपानंतर उरुळी कांचन पोलिसांनी पिडीत महिलेची तक्रार नोंदवून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी, या निमित्ताने उरुळी कांचन पोलिसांची बेफिकिरी समोर आली आहे.
संदेश जाधव (रा. खेडेकर मळा उरूळी कांचन ता. हवेली) असे त्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, वरील प्रकार गुरुवारी (ता. 13) घडलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, विनयभंगाची तक्रार नोंदविण्यास नकार देणाऱ्या पोलिसांची देखील चौकशी करण्याची मागणी पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरात पिडीत महिलेच्या सासऱ्याची एक टपरी आहे. चार दिवसांपूर्वी पिडीत महिलेचे सासरे काही वेळासाठी जेवणानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर शेजारी राहणारा आरोपी जाधव हा यावेळी टपरीवर आला. त्याने पिडीत महिलेचा हात धरून तू माझ्यासोबत कायम रहा, तू तुझ्या नवऱ्यामध्ये काय बघून लग्न केले आहे’, असे म्हणत पीडितेच्या अंगावरील ओढणी ओढली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
पिडीत महिलेने विरोध केला असता, त्या झटापटीत गळयातील मंगळसुत्र कोठेतरी पडून गहाळ झाले. आरोपी जाधव याने घडलेला प्रकार कोणाला सांगू नको. तसेच पोलीसांत तक्रार देऊ नको, नाहीतर मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी संदेश जाधव याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तब्बल बारा तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर घटना ही मंगळवारी (ता. ११) घडली होती. यावेळी जाधव याला पिडीत महिलेचा पती व त्यांच्या काही साथीदारांनी मारहाण केली होती. त्यानंतर जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पिडीत महिला उशिरा तक्रार देण्यास आल्याने उरुळी कांचन पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पिडीत महिला व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांची सुरक्षितता ‘राम’भरोसेच असल्याचे दिसून येत आहे.
अजिबात गांभीर्य नाही
उरुळी कांचन व परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील काही पोलिस अधिकारी व कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गुन्ह्यांचे तपास गतीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील कुचकामी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत अधिक बोलताना उरुळी कांचन येथील भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्या पुजा सणस म्हणाल्या, संदेश जाधव याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी एक महिला व तिचे नातेवाईक गुरुवारी बारा तासांपेक्षा अधिक काळ पोलिस ठाण्यात बसून होते. मात्र, खुद्द वरीष्ठ पोलिस अधिकारीच सदर महिलेची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. अखेर पुनम चौधरी आल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी दखल घेतली व संदेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महिनाभरापुर्वी तळवाडी चौकातील एका अंडाबुर्जीची हातगाडी चालवणाऱ्या इसमाला मारहाण झाली होती. या प्रकरणात देखील उरुळी कांचन पोलिसांनी अशा पध्दतीने गुन्हा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. उरुळी कांचन पोलिसांच्या अशा कारनाम्यांबद्दल, पुढील काही दिवसांत पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी आरोप फेटाळले..
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, तक्रार घेण्यासाठी उशीर झालेला नाही. महिलेवर कुठलाही अन्याय झाला, तर अगोदर महिलेने तात्काळ तक्रार दिली पाहिजे. ज्यावेळी महिलेवर आरोप केला जातो, गुन्हा दाखल केला जातो. यावेळी महिला तक्रार देण्यासाठी येते, तर त्या संदर्भाची शहानिशा करावी लागते, असं पाटील यांनी म्हटले आहे.