उरुळी कांचन : जिल्ह्यातील बहुचर्चित स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे. नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे सुरु करण्याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने वारंवार बातम्यांद्वारे पाठपुरावा केला होता.
राज्य सरकारने नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली. या संदर्भातील आदेश १३ डिसेंबर २०२१ रोजी गृहविभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता. स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली आहे. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन लांबले होते. राज्याच्या मंत्रिमंडळातील ‘पॉवर’बाज मंत्री महोदयांना पोलिस ठाण्याच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबल्याची चर्चा उरुळी कांचनसह परिसर व खुद्द पोलिस दलात सुरु झाली होती.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पहिले पोलीस निरीक्षकपद भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील पदभार सांभाळणार आहेत; तर त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे २ पोलिस अधिकारी, ३२ पोलिस कर्मचारी मनुष्यबळ मंजूर करून दिले आहे.
दरम्यान, उरुळी कांचन व परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे. शैक्षणिक, अभियांत्रिकी, वैद्यकीयसह स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे तालुका, बाहेरील विद्यार्थ्यांचा ओढा आहे. स्थानिक, परप्रांतिय मजूरही येत असल्याने व वाढत्या उपनगरांमुळे कायदा सुव्यवस्था राखताना पोलीसांना ताण सहन करावा लागतोय. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची नितांत गरज होती.