उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गावठी दारू बनविणाऱ्या दोन अड्ड्यांवर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे कच्चे रसायनसह गावठी दारू उध्वस्त केली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंखाबाई व्यंकट राठोड (रा. शिंदवणे, काळेशिवार, ता. हवेली) व लाला उर्फ कांतिलाल जवाहर राठोड (रा. शिंदवणे, काळेशिवार, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार शरद भानुदास चव्हाण व विशाल हरिश्चंद्र जावळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरात असलेल्या मुळा-मुठा कालव्याच्या शेजारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू लाला राठोड व पंखाबाई राठोड तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पथकासह छापा टाकला असता त्या ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेत लाला राठोड हा त्या ठिकाणावरून पळून गेला. तर दुसऱ्या अड्ड्यावरून पंखाबाई राठोड ही देखील काटवाणात पळून गेली.
उरुळी कांचन पोलिसांनी लाल राठोड याच्या अड्ड्यावरून 70 हजार 300 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य व 70 लिटर तयार दारू असा 70 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल तर पंखाबाई राठोड हिच्या अड्ड्यावरून काळेशीवार परिसरात 38 हजार 800 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य व 35 लिटर तयार दारू असा 1 लाख 9 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल दोन्ही ठिकाणावरून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.