उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उमेश उर्फ टक्का, सेवानिवृत्त गार्ड, (वय ४९, रा. बेतवस्ती लोणी काळभोर ता. हवेली), दिलीप शिवाजी सोनवणे, (वय ३८, रा. हवेली) विवेक माणिक काळभोर (वय – ५५, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ तीन पत्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरित उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, सदर ठिकाणी पोलीस पोहोचले असता त्याठिकाणी तिघेजण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याच्या जवळ असलेले जुगाराचे साहित्य, भारतीय चलनातील नोटा, आढळून आल्या. त्यानुसार त्या ठिकाणी मिळून आलेला ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून अधिक तपास पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.