उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरातील हातभट्टीच्या अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी हातभट्टीची ४० हजार ७०० रुपयांची दारू जप्त केली आहे.
सोमवारी (ता. २२) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पांढरस्थळ परिसरातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अंकुश लक्ष्मण खलसे, अशोक खलसे (दोघेही रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण जगन्नाथ शेलार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात गावठी हातभट्टीची दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता अंकुश खलसे व अशोक खलसे यांच्याजवळ २० हजार रुपयांचे कच्चे रसायन, २० हजार रुपयांचे जळके रस, रसायन व इतर साहित्य असा ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी अंकुश खलसे व अशोक खलसे यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.