हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन शहरातून जाणार्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या पथकर मार्गावर तसेच उरुळी कांचन गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारल्या आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी कोणतेही वाहनतळ केलेले दिसून येत नाही. त्यामुळे दुकानात ग्राहक जाताना त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकी, चारचाकी, वाहने चक्क रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होतो व वाहतुकीस अडथळा येत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पथकर नावाला असून, त्यावर टपरीवाले, भाजीविक्रेते आदी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत.(Uruli Kanchan News)
उरूळी कांचनमधील मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झालेले आहे. त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. उरुळी कांचनमधील बहुतेक शाळा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार, आश्रम, पतपेढ्या, यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनांची रस्त्यावर पार्किंग केली जाते. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.(Uruli Kanchan News)
दरम्यान, तळवडी चौकातील वाहतूक व्यवस्था तसेच सेवा रस्त्यावर उभे असणारे खाजगी वाहतूक करणारी वाहने यामुळे जेजूरीकडून सोलापूरसह – पुण्याकडे जाणार्या येणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. परिसरात वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. त्यामुळे वाहने लावण्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश वाहने रस्त्यावरच लावली जातात.(Uruli Kanchan News)
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बॅरिकेड्सची उभारावेत..
उरुळी कांचन पोलीस चौकीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत. या नागरिकांना पुणे-सोलापूर महामार्गावर येण्यासाठी एकच रस्ता आहे. मात्र, महामार्ग जाम झाला असता बरेचसे चारचाकी व दुचाकी चालक या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महामार्ग व सेवा हे दोन्ही रस्ते बंद होतात. त्यामुळे पोलीस दूरक्षेत्रासमोर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस दूरक्षेत्रासमोर बॅरिकेड्सची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.(Uruli Kanchan News)
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामपंचायतची बाजारपेठ ही मोठी असून, या गावात जाण्यासाठी मुख्य दोनच रस्ते आहेत. यावेळी या बाजापेठेत येणाऱ्या व जाणाऱ्या व्यापाऱ्यांची, नागरिकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपआपल्या दुकानापुढे गाड्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीला मदत लागल्यास कायम तत्पर आहोत. तसेच शनिवारी व रविवारी रस्त्यावर गर्दी असते. तसेच रविवारी बाजार व सुट्टीचा दिवस असल्याने दोन दिवस या ठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात. त्यामुळे रुग्णवाहिका व दुचाकीचालक यांची वाहतूक कोंडीतून सुटका होते.(Uruli Kanchan News)
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड, महात्मा गांधी रस्त्यावर ज्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यांनी पार्किंगची सुविधा करावी. काहीजण अनाठायी तासन् तास गाड्या लावून निवांतपणे फिरतात, अशा निवांत गाडी लावून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. याबाबत लोणी काळभोर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच अनधिकृत पार्किंग होत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.(Uruli Kanchan News)
याबाबत बोलताना सानाजिक कार्यकर्ते शुभम काळे म्हणाले, “उरुळी कांचन पोलीस चौकीत जाण्यासाठी रस्ता दुभाजकाजवळ बॅरिकेड्स लावल्यास दुचाकी जाण्यासाठी जागा ठेवल्यास मोठी वाहने महामार्ग सोडून सेवा रस्त्यावर येणार नाहीत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व तात्काळ रुग्णवाहिका जाऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारावीत.” (Uruli Kanchan News)