उरुळी कांचन (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवस्ती परिसरात दोन बकऱ्यांना बिबट्याने शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हल्ल्यात अमोल दत्तोबा राऊत यांचे ६ हजार रुपयांचे तर बाळासाहेब रूपनर यांचे १० हजार रुपयांचे असे एकूण १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अमोल राऊत राहत असलेल्या ठिकाणावरून बिबट्याने एका लहान बकऱ्यावर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच रविवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास बाळासाहेब रूपनर यांच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे.
शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या पुन्हा आढळल्याने नागरिकांनी फटाके उडवून बिबट्याला त्या ठिकाणावरून पळवून लावले. नागरिकांनी संबंधित माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. वनाधिकाऱ्यांनी समक्ष नागरिकांसह रविवारी सकाळी शेत शिवारात बिबट्यांच्या ठशांची पाहणी करून पंचनामा केला आहे.
दरम्यान, शिवारात बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. शेतात मजूर कामास येण्यास टाळाटाळ करीत आहेत. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत मागील काही दिवसांपासून बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले आहे. त्यातच टिळेकरवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.