उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील चक्क रोपांच्या नर्सरीत हातभट्टीची गावठी तयार दारू विक्री करणाऱ्या व जागेच्या मालकावर अशा दोघांवर उरुळी कांचन पोलिसांनी धडक कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. २६) केली आहे. तसेच सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातही कारवाई करण्यात आली आहे.
राजेंद्र चौधरी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व जागामालक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ठिकाणावरून ३५० लिटर कच्चे रसायन, ९ हजार १५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा ६ लाख ४५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातील गावठी हातभट्टीची २ लाख ४२ हजार रुपयांची ५२५ लिटर तयार दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कयादू राठोड (नाव व पत्ता माहिती नाही) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही ठिकाणांवरून तब्बल ८ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरतापवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करत असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले असता सोरतापवाडी, शिंदवणे गावच्या हद्दीत कॅनॉलच्या कडेला गावठी हातभटट्टीची तयार दारू करण्यासाठी भट्टी चालू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी छापा टाकला असता, ५ हजार लिटर कच्चे व जळके रसायन तसेच गावठी हातभट्टीची २ लाख ४२ हजार ५५० रुपयांची ५२५ लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. यावेळी दारू तयार करणारी महिला कयादू राठोड ही पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरगांव मुळ ग्रामपंचायत हद्दीत राजेंद्र चौधरी यांच्या नर्सरीमध्ये गावठी हातभटट्रीची तयार दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी राजेंद्र चौधरी याच्यावर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर जमीन मालक याच्यावरहि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नवले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, रणजित निकम, सचिन जगताप, मनिषा कुतवळ, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.