उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीत मटका अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडून रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
प्रकाश कचरू पवार (वय २८, रा. जय मल्हार रोड, जाधववस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली, मुळ रा. सर्व्हे नं. २५९, महात्मा गांधी वसाहत, पांढरे मळा, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जयमल्हार रोडच्या कडेला पिंपळाच्या झाडाखाली प्रकाश पवार हा ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवत असताना आढळला. या कारवाईत रोख रक्कम, एक पांढऱ्या रंगाचे आकडेमोड केलेले पुस्तक, मोबाईल, एक कार्बन, असा १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.