हनुमंत चिकणे
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या लोणीकंद-जेजुरी मार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अलंकार मंगल कार्यालय या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. Uruli Kanchan News
या मार्गाने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषतः सोसायटी, मंगल कार्यालय, जिल्हा परिषद शाळा असून त्याठिकाणी शाळेतील मुले रस्ता ओलांडून जात-येत असतात. या भरधाव वाहनांमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित राहून संभाव्य अपघाताची संख्या रोखण्यात यश येईल.
रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता असल्यामुळे वाहणे सुसाट वेगाने धावत असतात. वाहनांना वेग मर्यादा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच दुचाकीचा अपघात झाल्याने एक युवक गंभीर जखमी झाला होता. रहदारीच्या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहने चालवताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. Uruli Kanchan News
महामार्गावरून लोणीकंद, वाघोली गावाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. वेगात वाहने जात असल्याने अपघाताच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. मोठी घटना टाळण्यासाठी याठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी कोरेगाव मूळ येथील नागरिकांनी ठेकेदाराकडे केली होती. वारंवार मागणी करून देखील संबंधित ठेकेदार कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या लोणीकंद-जेजुरी मार्ग सध्या धोकादायक ठरत आहे. या वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. वाहतूक पोलिस व पालिकेने त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर या मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत संबंधित ठेकेदार भागवत पाटील म्हणाले, “सदर ठिकाणी गतिरोधक बसवार आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने डांबराचे गतिरोधक करता येणार नाहीत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे रम्ब्लंस पुढील आठ ते दहा दिवसात बसविण्यात येतील.”
याबाबत बोलताना अलंकार मंगल कार्यालयाचे मालक श्रीकांत कोंडे म्हणाले, “सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता असल्यामुळे वाहणे सुसाट वेगाने जात आहेत. सदर ठिकाणी वस्ती असून त्या ठिकाणावरील लहान मुले शाळेत येत आहेत. वाहनांना वेग मर्यादा नसल्यामुळे मोठी वाहने, दुचाकी, सुसाट धावत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी गतिरोधक बसवावा. Uruli Kanchan News