उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महिलांना 7038311431 या नंबर वरुन फोन करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे भासवून लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरले गेले आहेत. त्याचा ओटीपी (OTP) सांगा, तुमचा बँक अकाउंट नंबर सांगा, अशा बऱ्याचशा गोष्टी विचारत आहे. तसेच महिलांबरोबर चुकीच्या भाषेत बोलत आहे. तरी हा मोबाईल नंबर शोधून या नंबरची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित कांचन व जिल्हा युवती उपाध्यक्ष पूजा सणस यांनी केली आहे.
राज्यातील गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची संधी साधून तिचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन महिलांनीही सावधानता बाळगावी, असे आवाहन भाजपा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिला सायबर कॅफेमध्ये गर्दी करत आहे. सायबर कॅफे चालक फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची झेरॉक्स ठेवून घेत आहेत. त्यानंतर कॅफे चालक वेळेनुसार फॉर्म भरून फोनवर ओटीपी विचारत आहेत. दरम्यान, सायबर चोरटे देखील फोन करून ओटीपी विचारू शकतात. त्यामुळे फोनवर ओटीपी विचारणारा कॅफे चालकच आहे का, याची खात्री करून मगच महिलांनी ओटीपी शेअर करावा.
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सायबर चोरटे महिलांना ओटीपी मागू शकतात. ओटीपी दिल्यास बँक खात्यावरील रक्कम गायब होऊ शकते, तसेच, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास भाग पाडू शकतात. त्यामुळे मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. फसवणूक टाळण्यासाठी महिलांनी मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतीही कृती करू नये.
दरम्यान, लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरताना महिलांनी खात्रीशीर चालकांकडूनच फॉर्म भरून घ्यावा, अनोळखी व्यक्तींसोबत माहिती शेअर करू नये. तसेच, कागदपत्र जमा करताना त्यावर तारीख आणि लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करावा.
याबाबत बोलताना शहराध्यक्ष अमित कांचन म्हणाले, ” 70383 11431 या नंबर वरुन उरुळी कांचन परिसरातील महिलांना फोन येत आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरले गेले आहेत. त्याचा OTP सांगा, तुमचा बँक अकाउंट नंबर सांगा, अशा बऱ्याचशा गोष्टी विचारत आहे. महिलांचे व्हॉट्स अप हॅक केले जात आहे. तरी या नंबरची पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, आशा कुठल्याही नंबर वरनं कोणालाही ओटीपी सांगण्यात येऊ नये.
अशी होऊ शकते फसवणूक…
– योजनेचा पहिला हप्ता जमा करायचा असून शहानिशा करण्यासाठी संपर्क करत असल्याचे भासविले जाऊ शकते.
– फोनच्या माध्यमातून समोरची व्यक्ती तुमच्याकडे ओटीपी मागू शकतो.
– एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला किंवा एखादे अॅप्लिकेशन उघडायला सांगितले जाऊ शकते.
– लिंकवर क्लिक केल्यास किंवा ओटीपी दिल्यास फोन हॅक होऊ शकतो, त्यामुळे तुमचे बँक अकाउंटदेखील रिकामे होऊ शकते.
ही सावधगिरी गरजेची…
– कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
– बँक खात्याचा तपशील अथवा ओटीपी कुणालाही देऊ नका.
– फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
– जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा.