Uruli Kanchan News लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पीएमपीएल बस स्थानकाच्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. (Uruli Kanchan News) बस स्थानकाजवळ त्वरित स्वच्छतागृह उभारावे आणि ज्येष्ठ तसेच महिला प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उरुळी कांचन शाखेने केली आहे. (Uruli Kanchan News)
उरुळी कांचन भाजपच्या वतीने सरपंच भाऊसाहेब कांचन यांना निवेदन
उरुळी कांचन भाजपच्या वतीने या मागणीचे निवेदन सरपंच भाऊसाहेब कांचन यांना बुधवारी (ता. १२) देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा युवती अघाडी उपाध्यक्ष पूजा सणस, भाजपचे उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित सतीश कांचन, हवेली तालुका झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, विवेक कांचन, अक्षय रोडे, गणेश घाडगे, अजिंक्य कांचन, नीलकंठ सूर्यवंशी, काजल खोमणे, साक्षी कांचन व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. याठिकाणी राष्ट्रीयीकृत, सहकारी, जिल्हा बॅंका, आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालय असल्याने दररोज हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा असते. उरुळी कांचन बाजारपेठेत परिसरातील ३० ते ३५ गावांतील ग्रामस्थ, महिला खरेदीसाठी येतात. तसेच नोकरवर्ग, खासगी डॉक्टरकडे येणारे रुग्ण तसेच अन्य कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा सतत राबता असतो. परंतु गावातील पीएमपीएल बस स्थानकावर आल्यानंतर स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उरुळी कांचन भाजपच्या वतीने सरपंच भाऊसाहेब कांचन यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पूजा सणस म्हणाल्या की, सद्यःस्थितीत उरुळी कांचन येथील पीएमपीएल बस स्थानकाजवळ महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला, तसेच शाळकरी विद्यार्थिनींना ओळखीच्या व्यक्तींना विनंती करून त्यांच्या व्यक्तिगत स्वच्छतागृहाचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे. अनेकदा नैसर्गिक विधीचा रोखल्याने आजारांना बळी पडावे लागते. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन, बस स्थानकाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी त्वरित प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाअभावी होणाऱ्या गैरसोयीबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले की, उरुळी कांचन येथील पीएमपीएल बस स्थानकाच्या परिसरात कोणतीही शासकीय अथवा सार्वजनिक जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतागृह बांधून दिले जाईल.