उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आकाश सोमनाथ म्हात्रे (वय २३ रा. दासवेवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली) व अरविंद रामलाल राजपूत (वय ६५, रा. गोळीबार मैदान, उरूळी कांचन ता. हवेली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ हद्दीतील दासवे वस्ती येथे जावेद शेख यांचे घराचे शेजारील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला आकाश म्हात्रे तर उरूळी कांचन हद्दीतील गोळीबार मैदान येथे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अरविंद राजपूत याच्याकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची तयार दारू मिळाली. याप्रकरणी या दोघांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आकाश म्हात्रे याच्याकडून १ हजार २५० रुपये तर अरविंद राजपूत याच्याकडील गावठी हातभट्टीची तयार दारू ६० लिटर असा ३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत.