उरुळी कांचन (पुणे) : माफ करा, कोणालाही दोशी धरू नका, असे जमिनीवर लिहून ठेवत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी तांबे वस्ती परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
दिगंबर गोविंद गोसावी (वय ५५, रा. जुनी तांबे वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी आकाश दिगंबर गोसावी (वय ३०) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर गोसावी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असल्यामुळे त्यांना अशक्तपणा असायचा.
दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश गोसावी यांना खोलीतील फरशीवर खडूने “गौरी मुंगेरीलाल” व “आकाश” मला माफ कर” असे लिहिलेले दिसले तसेच तिथेच शेजारी “कोणालाही दोशी धरू नये” असे लिहून त्याखाली सही केलेली चिठ्ठी सापडली. तसेच घरातील लोखंडी अॅंगलला दोरीच्या सहायाने दिगंबर गोसावी यांनी गळफास घेतलेला आढळून आला.
दरम्यान, कोणतीही हालचाल होत नसल्याने आकाश गोसावी यांनी तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व गोसावी यांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरम्यान, यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच गोसावी हे मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.