उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. याच भागात पुरोगामी माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांसमोरच जीव धोक्यात घालून चुकीच्या पद्धतीने महामार्ग ओलांडताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, सोरतापवाडी, पेठसह परिसरातील वाडी वस्त्यांवरील तसेच नर्सरी चालक, कामगारांच्या मुलांची पुरोगामी विद्यालयात मोठी संख्या आहे. शाळेत येण्यासाठी काही विद्यार्थी सायकल, दुचाकीचा वापर करत आहेत. तर काही विद्यार्थी हे नियम मोडून शिक्षकांसमोरच धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून नियमांची सर्रास पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी शाळा प्रशासन घेणार का? त्यामुळे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नियमित बसेस सुरु होणे आवश्यक आहे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
काही विद्यार्थ्यांसाठी बसेसची सोय..
शाळेतील काही विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळत नाही. परिणामी, रिक्षा, सहा आसनी रिक्षा, पीएमपीएमएल, तसेच मिळेल त्या वाहनाला हात करून घरी जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.
यापुढे काळजी घेण्यात येईल ; मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण
‘पुरोगामी विद्यालयातील दोन शिक्षक व दोन शिपाई हे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात. मात्र, काही विद्यार्थी हे अनवधानाने पळत गेले असतील त्या विद्यार्थ्यांची यापुढे काळजी घेण्यात येईल’, असे शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र जाधव यांनी सांगितले.