उरुळी कांचन, (पुणे) : मागील आठ दिवसांपासून जळालेल्या रोहित्राची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांने गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अंकुश मोरे असे मुजोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ परिसरातील एक रोहित्र मागील सात दिवसांपूर्वी जळाले होते. याबाबत उरुळी कांचन महावितरण कार्यालयातील कर्मचारी कानतोडे यांना संबंधित शेतकऱ्यांनी रोहित्र जळाल्याची माहिती दिली होती. तसेच परिसरातील कालव्याला आणखी दोन दिवस पाणी असून तुम्ही रोहित्र लवकर जोडून द्या, अशी विनंती केली. पाच दिवस झाले तरी अजूनही रोहित्र दुरुस्त झाले नसल्याने परिसरातील नागरिकांचे पाण्यामुळे व विजेअभावी प्रचंड हाल सुरु झाले होते. यावेळी नागरिकांनी फोनवरून त्या कर्मचाऱ्याला रोहित्राबद्दल सदरची माहिती विचारली असता त्या कर्मचाऱ्याने रोहित्र जळाल्याची माहिती वरिष्ठांना कळविली असल्याची माहिती दिली.
याबाबत परिसरातील शेतकरी शिवाजी खेनट, अक्षय जरांडे, श्याम जरांडे, रवींद्र म्हस्के, बबन जरांडे यांच्यासह परिसरातील काही नागरिक उरुळी कांचन येथील कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेले. यावेळी अंकुश मोरे यांना पांढरस्थळ येथील रोहित्र जळाल्याची तक्रार दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी कर्तव्यावर असलेल्या कानतोडे कर्मचाऱ्याला दिली असल्याचे सांगितले. यावेळी कानतोडे यांनी कोणतीही माहिती कार्यालयात दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.
परिसरातील नागरिकांनी याबाबत आवाज उठवला व यवत या ठिकाणावरून एक रोहित्र दुरुस्त करून आणले आहे. आम्ही जोडून घेतो, असे शेतकरी म्हणताच मोरे यांनी शेतकऱ्यांनाच दमदाटी करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. यावरून नागरिक व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
दरम्यान, याबाबत शेतकरी व नागरिकांनी उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते अमित कांचन व आबासाहेब चव्हाण यांना सदरची घटना सांगितली. दोघांनीही याप्रकरणी नागरिकांना मदत केली. याबाबत सदर नागरिकांनी व शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून उद्या शनिवारी (ता. 04) रोहित्र दुरुस्त झाले नाही, तर कार्यालयातच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बाहेरचा रोहित्र बसवू शकत नाही. तसेच मी कोणत्याही शेतकऱ्याला जेलमध्ये टाकेल किंवा गुन्हा दाखल करेन, असे म्हणालो नाही.
अंकुश शिवाजी मोरे, सहायक अभियंता, उरुळी कांचन, ता. हवेली.
“मागील आठ दिवसांपासून बंद रोहित्र सुरु करा, अशी मागणी केली होती. तसेच आम्ही यवत वरून एक रोहित्र आणले आहे, हे बसवून द्या असे म्हटले असता यावेळी मोरे यांनी सदर शेतकऱ्यांवर १३८ चा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली.
अक्षय जरांडे, शेतकरी, (पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली)