लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर तसेच उरुळी कांचन, जेजुरी मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीला ग्रहण लागले आहे. हे ग्रहण काही केल्या सुटत नाही, अशी भयानक अवस्था सध्या पूर्व हवेलीतील मार्गावर आहे. चारचाकी, जड व दुचाकी वाहनांच्या अगदी एक, दोन किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक, प्रवाशी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार सारेच या वाहतूक कोंडीने संतप्त झाले आहेत.
शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे खासदार व आमदार आहेत. तरीही यांच्याकडून पुणे-सोलापूर महामार्गाबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान मांजरी बुद्रुक येथे बाजार समितीसमोर, शेवाळेवाडी, फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील एलाईट व तळवाडी चौकात वाहतुकीची कोंडी होणे, ही बाब नित्याचीच झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, (अजित पवार गट), (शरद पवार गट), कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, (शिंदे गट), (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) इतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, या पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारील गावात राहत आहेत. तसेच विविध मोठमोठी पदे घेऊन मिरवणारे अनेक नेते याच पुणे-सोलापूर महामार्गावरील गावात राहतात. मात्र, नागरिकांना होणारा त्रास यांना दिसत नसल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे काही घेणे देणे नसल्याची वास्तविकता नाकारता येणार नाही.
लोणी काळभोर, उरुळी कांचन ही गावे ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित झाल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरामध्ये मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडी होत असून, ऊसाचा हंगामही सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी ही गेल्या अनेक वर्षापासून सारेच अनुभवत आहेत. हडपसर ते उरुळी कांचन परिसरात असलेली मंगल कार्यालये, हॉटेल्स तसेच सोलापूर व पुण्याच्या बाजूने जाणारी अवजड वाहने, वऱ्हाडी, व स्थानिक नागरिकांच्या वाहनांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
रस्त्यावरच केली जातात वाहने पार्क
पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, मांजरी, शेवाळवाडी परिसरात मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. मात्र, यातील काही मंगल कार्यालयांकडे स्वतःची जागा कमी असल्याने त्यांच्याकडे येणारी वाहने ही रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात. परिणामी, वाहतूक कोंडी होण्यास वऱ्हाडींची वाहने कारणीभूत ठरत आहेत. मंगल कार्यालयांना स्वतःची वाहनतळाची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे बनले आहे. गल्लीबोळात कार्यालये थाटल्याने त्यांच्याकडे आलेली वाहने रस्त्यावरच उभी असतात.
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकीत अपवाद वगळता बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी होत असते. तसेच एमआयटी या शैक्षणिक संस्थेत व रेल्वे मालधक्का व एका रासायनिक खताच्या कंपनीकडे जाणाऱ्या जड वाहनांचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, कदमवाकवस्ती, स्टेशन चौक, एमआयटी चौकात कायम वाहतूक कोंडी जाणवते. कामगारवर्ग, विद्यार्थी या स्थानिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो.
महामार्गावरून शनिवार, रविवार अनेक जण सुट्टीवरून माघारी ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत तीन ते चार पटीने वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अतिक्रमण काढून उड्डाणपूल बनविण्याची गरज आहे.
– भाऊसाहेब कांचन, सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु वाहनांची वाढलेली संख्या, अरुंद मार्ग त्यामुळे पोलीस हतबल आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने लोणी काळभोर टोलनाका ते कासुर्डीपर्यत (ता. दौंड) उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे.
– संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, (ता. हवेली)
महामार्गावर आणखी एक लेन वाढविण्यात यावी यासाठी लांडेवाडी येथे होणाऱ्या सभेत शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहे.
– अलंकार कांचन, सदस्य, जिल्हा नियोजन समिती , शिवसेना, (शिंदे गट), उरुळी कांचन.
उरुळी कांचन मार्गे जाणाऱ्या नवीन मोठ्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने, उरुळी कांचन वाहतुकीच्या दृष्टीने या भागात केंद्रस्थानी आलेले आहे. त्यामुळे वाहनांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी बायपास, उड्डाणपूल अथवा सहा पदरी रस्ता तयार होण्याची गरज आहे.
– विकास जगताप, उपाध्यक्ष, भाजप राज्य व्यापार आघाडी.
महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊनही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे दररोज नागरिकांचा, विद्यार्थ्यांना अर्धा तास कोंडीतून बाहेर काढण्यासाठी जात आहे. त्यामुळे उड्डाणपूल अथवा सिक्स लेन रोड तयार होण्याची गरज आहे.
– अजिंक्य कांचन, रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य, उरुळी कांचन.