उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर होर्डिंग दुर्घटनेच्या पाश्वर्भूमीवर उरुळी कांचन ग्रामपंचायतीला जाग आली आहे. पुणे – सोलापूर महामार्गालगतचे अनधिकृत व धोकादायक होर्डिंग, फ्लेक्स तातडीने हटवण्यासाठी नोटीस उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी व्यावसायिकांना दिली आहे. होर्डिंग कोसळून दुर्घटना झाल्यास याबाबत होर्डिंग जागा मालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच पोलीस प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने अवकाळी येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर ठिकाणी लावलेले अनाधिकृत पोस्टर, बॅनर फ्लेक्स, जाहिरात फलक व होर्डिंग्ज 2 दिवसात काढून घेण्यात यावेत. अन्यथा ग्रामपंचायत मार्फत काढण्याची कार्यवाही करून त्याचा खर्च सदर व्यावसायिकांकडून वसूल केला जाईल.
दरम्यान, अनाधिकृत पोस्टर, बॅनर, फलेक्स बसविलेबद्दल फौजदारी कारवाई का करू नये याचा खुलासा दोन दिवसात करावा. अन्यथा आपणावर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदयानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील नोटिशीत म्हटले आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे म्हणाले की, पुणे – सोलापूर महामार्गाच्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दोन्ही बाजूला तसेच उरुळी कांचन – जेजुरी राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या आदेशानुसार होर्डिंग धारकांना नोटीस बजावली असून अनधिकृत होर्डिंग धारकावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला होर्डिंग, फ्लेक्सचे लोखंडी सांगाडे उभे
पुणे – सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला बेकायदा होर्डिंग तसेच जाहिरात फलक लावण्यासाठी बांधण्यात आलेले लोखंडी सांगाडेबाबत चौकशी केली असता उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एकही होर्डिंगची परवानगी नसल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील अनेक होर्डिंग, फ्लेक्स लावण्यासाठीचे लोखंडी सांगाडे तसेच उभे आहेत. यापासून नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. यासाठी महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रशासन यांच्या समन्वयातून कारवाई होऊन कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.
पालखीपूर्वी ठोस उपाययोजना आवश्यक
या महामार्गावरून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, पाटसहून बारामतीच्या दिशेने जातो. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठी होर्डिंग तसेच फ्लेक्सचे सांगाडे उभे आहेत. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारा पाऊस असतो. अशावेळी वैष्णव भक्तांना धोका होऊ शकतो. यामुळे अशा ठिकाणी आतापासूनच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.