उरूळी कांचन (पुणे) : हैद्राबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्तात बकऱ्या विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व उरूळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
अमोल काढण भोसले (वय ३२, रा. कोळगाव पांढरेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण (वय १९, रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर) व श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण (वय २३, रा. वेठेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो असे सांगून उरुळी कांचन येथे बोलावून घेतले. त्या इसमास व त्याच्या साथीदारांना बकऱ्या दाखविण्यासाठी शेताकडे नेले आणि त्याठिकाणी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, ५ लाख रुपये, मोबाईल, गळ्यातील चेन असा ५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत चालू असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल भोसले याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला आहे. तपास करत असताना संशयित गुन्हेगार अमोल भोसले हा त्याच्या साथीदारांसोबत लोणावळा परिसरात आल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरील तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी अमोल भोसले यांच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सुधीर पाडुळे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, दीपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास उरूळी कांचन पोलीस करत आहेत.