उरुळी कांचन, (पुणे) : पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित चौधरी व त्यांच्या दोन मित्रांमुळे एमआयटीत शिक्षण घेणाऱ्या अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचले आहेत. पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर पेट्रोल पंपाच्या शेजारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. सोहम पवार असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, अपघातावेळी सोलापूर व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तसेच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी 108 क्रमांकावर फोन करूनही तब्बल अर्धा तास झाले तरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. यावेळी अपघातस्थळी असलेले पेठचे सामाजिक कार्यकर्ते सुजित वसंत चौधरी यांनी माणुसकी दाखवत स्वतःच्या गाडीत सारथ्य करीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोहमला त्यांचे मित्र अक्षय संभाजी कुंजीर, प्रतिक पांडुरंग चौधरी यांच्यासमवेत लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल केले. सुजित आणि त्याच्या या कार्यामुळे सोहमचा जीव वाचला आहे.
सुजित चौधरी व त्याच्या मित्रांचे होतंय कौतुक
सोहम पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला आणखी २० मिनिटे उशीर झाला असता तर त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले असते. सुजित चौधरी यांनी चपळाई, जागरुकता आणि शोधक नजर या बळावर बजावण्यात आलेल्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. रुग्णवाहिकेची वाट न बघता स्वत: राबवलेल्या या मोहिमेबद्दल परिसरात सुजित चौधरी व त्याच्या मित्रांचे कौतुक होत आहे.