पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघाबाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला, तर हडपसर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिला जाईल. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये २००२ साली स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे व माजी नगरसेवक दत्तोबा ससाने यांनी हडपसर विकास आघाडी नावाने पॅनल उभे केले होते. तो प्रयोग यशस्वी झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा अशाच प्रकारे विकास आघाडी स्थापन करत तयारी केली असून, यामध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) व काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवकांचा सहभाग आहे. रविवार, २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले, ते वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना पोहोचवणार आहेत. आमच्या मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास पक्षातील इच्छुकांनी व्यक्त केला. महादेव बाबर, योगेश ससाणे, आनंद अलकुंटे, बाळासाहेब शिवरकर, नीलेश मगर, समीर तुपे, बंडू गायकवाड असे तीनही पक्षांतील इच्छुक आता एकत्र झाले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा फेर विचार झाला नाही, तर हडपसर विकास आघाडीचा प्रयोग या वेळेस हे सर्व इच्छुक आजमावणार आहे. आज (दि. २८) सोमवार संध्याकाळपर्यंत वाट पाहून परवा दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे.