उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात 90 च्या दशकातील हिंदी बॉलीवूड गाण्यांवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थित प्रेक्षकांसह उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले यांनी दाद दिली.
या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक सुरेश कांचन, विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा नयॉन कांचन, प्राचार्या डॉ. नुपूर कांचन उपस्थित होत्या. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पालक, विद्यार्थिनीना आमंत्रित करण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले यांनी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करून प्रशंसा केली. तसेच मुलींची शाळा असल्याने शाळेमध्ये मुलींना पोलीस प्रशिक्षणसारखे कार्यक्रमाचे लवकरच आयोजन करण्याचे आश्वासन दिले. तसेच शाळा प्रशासन व कार्यक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, विद्यार्थिनींनी आपल्या सुंदर, नृत्य आणि नाट्य सादरीकरणाने सर्वांचे मनोरंजन केले. संपूर्ण कार्यक्रम 90 च्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टी या विषयावर आधारीत होता. यामध्ये वैविध्यपूर्ण साधनांचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तसेच खूप प्रशंसा करण्यात आली. विद्यार्थिनीच्या तीन तासांच्या भव्य सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता प्राचार्या नुपूर कांचन यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.