प्रदिप रासकर
शिरूर : शिरूर – श्रीगोंदा शिवेवर एका तरुणाचा निर्घण खून झाला असून यामध्ये तरुणाचे शीर धडा वेगळे, दोन हात आणि एक पाय कापण्यात आला आहे. यामुळे शिरूरसह श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे. या मृतदेहाचे शीर, दोन हात व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळल्या आहेत. हा मृतदेह शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान हा मृतदेह पाहून जीवाचा थरकाप उडत आहे. मृतदेहाचे शीर, दोन्ही हात व पाय अद्याप सापडलेले नाही. नक्की हा मृतदेह कोणाचा? याबाबत साशंकता असली, तरी दानेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील माऊली सतिश गव्हाणे हा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण सात मार्चपासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले. याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
परंतु, आढळून आलेला हा मृतदेह नक्की त्याचा की आणखी कोणाचा? याबाबत आज तरी शंका आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे आज (दि. १२) मिसिंग तरुणाच्या कुटुंबासह नातेवाईकांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली. दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्या मुलाचा असू शकतो. परंतु, मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसल्याने कुटुंबही द्विधा मनस्थितीमध्ये आहे.
मिसिंग फिर्यादीबाबत चौकशी सुरू असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. अशी माहिती शिरूर पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांनी दिली आहे.