उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गाच्या शेजारी असलेले मेडिकलचे शटर अज्ञात तीन चोरट्यांनी उचकटून मेडिकलमधील 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील ‘मोरया मेडिको’ येथे रविवारी (ता. 23) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, चोरी करून पळणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या तिघांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला व ते तिघेजण माघारी परतले. गेल्या काही दिवसांमध्ये उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या व चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत.
याप्रकरणी मेडिकल चालक अतुल गुंडीराम परभाणे (वय-25, धंदा मेडिकल स्टोअर्स, मुळ रा. वडगाव रासाई ता. शिरूर) सध्या रा. हॉटेल स्वाद मराठीच्या पाठीमागे, पुणे सोलापुर हायवे रोडजवळ, उरूळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पोलिसांची गस्त असूनही घरफोड्यासारखे गुन्हे घडत असल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त होते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल परभाणे हे कुटुंबीयासह राहण्यास आहे. पुणे सोलापुर हायवे रोडलगत माऊली हॉस्पीटल, येथे ‘मोरया मेडिको’ नावाचे मेडीकलचे स्टोअर्स असुन ते स्टोअर्स चालवुन कुटुंबाची उपजिवीका करतात. शनिवारी (ता. 22) दिनांक मेडीकलमध्ये कामगार रविंद्र पवार व अतुल परभाणे यांनी दिवसभर काम केले. त्यानंतर रात्री 10 वाजता मेडीकल दुकान बंद केले.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास माउली हॉस्पीटलमधील सिस्टर दिपाली घोडके यांनी मोबाईलवर फोन करुन सांगितले की, ‘मेडीकलच्या शटरचा आवाज येतोय, बहुतेक चोरटे आलेले आहेत. तरी तुम्ही लवकर या.’ यावेळी मोबाईलमध्ये सी. सी. टि. व्ही. फुटेज लाईव्ह सुरु असल्याने त्यामध्ये पाहिले असता, एक चोर मेडीकलच्या दुकानातील काउंटरजवळ पैसे मोजत असल्याचे दिसून आले.
अतुल परभाणे यांनी तत्काळ कामगार रविंद्र पवार, शैलेश हंगे, व्यंकटेश चाळक यांना मोबाईलवरून फोन माहिती दिली. यावेळी ते तिघेजण मेडिकलजवळ गेले असता तीन चोरटे पळून जाताना दिसून आले. त्यांचा पाठलाग हा कामगार रविंद्र पवार व त्याच्या बरोबर असणारे शैलेश हंगे व व्यंकटेश चाळक यांनी केला. परंतु चोरट्यांनी चाकु दाखविल्यामुळे पाठलाग करायचे थांबुन ते परत मेडीकल जवळ आले. यावेळी अतुल परभाणे यांनी रात्री येऊन मेडिकलची पाहणी केली असता दुकानातील 20 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, सदरचे चोरटे हे 18 ते 24 वर्षे वयोगटातील असून सी.सी.टि.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आले. त्या तिघांनी मिळुन मेडीकल दुकानाचे शटर उचकटुन त्यापैकी एकाने आत प्रवेश केल्याचे दिसुन येत होते. व दोन चोरटे बाहेर लक्ष ठेवत असल्याचे दिसून आले.
पोलिस गस्त नावालाच..
शहरात पोलिस ठाणेनिहाय दिवस-रात्र पोलिस गस्त असते. परंतु असे असतानाही गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. असे असतानाही, उरुळी कांचन व परिसरात चोरीच्या होत असलेल्या घटनांनी पोलिसांच्या गस्त नाकाम असल्याचेच अधोरेखित झाले आहे. निवडणुकीचा बंदोबस्तही संपला असून, ताणही हलका झाला आहे. तरीही पोलिस हद्दीत पोलिसांकडून गस्त होत नसल्यानेच चोरट्यांनी घरफोडीची संधी मिळत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नागरिकांकडूनच संशय व्यक्त होतो आहे. घरफोड्यांच्या घटनांना आळा बसावा यासाठी नियमित गस्त असावी व कामचुकारांवर कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.