पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे नवनवे प्रकार समोर येत असताना, आता बनावट आयपीएस अधिकारी बनून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune News) आला आहे. एका चप्पल विक्रेत्याला हजरोंचा गंडा घालणाऱ्या मायलेकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी ही घटना काय?

महात्मा गांधी रोड परिसरातील एका चप्पल-बूट विक्रेत्याच्या दुकानात 13 सप्टेंबरला सायंकाळी दोन महिला खरेदीसाठी आल्या होत्या. या महिलांनी आपण आयपीएस अधिकारी आहोत असे सांगून दुकानदाराला बनावट ओळखपत्र दाखवले. लग्नाचा कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणात चप्पल आणि बूट खरेदी करायचे आहेत असे सांगून त्यांनी दुकानदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील कामगाराला ‘पैसे घेण्यासाठी कमिशनर ऑफिसला चल’ असा रुबाबदार आदेश दिला.

हा रुबाब पाहून दुकानदार आणि कामगाराला त्या खऱ्या अधिकारी असल्याचा भास झाला. याच संधीचा फायदा घेत या मायलेकींनी 17 हजार रुपयांचे चप्पल-आणि बूट कोणतेही पैसे न देता घेतले आणि तिथून पळ काढला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात या मायलेकींचा शोध घेतला आणि मूळच्या कोंढवा भागातील असलेल्या या दोघींना अटक केली. बनावटगिरी आणि फसवणुकीच्या या कृत्याबद्दल या दोघींवर कायदेशीर कारवाई होणार असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे बनावट अधिकारी बनून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून, पुणेकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







